माझी कविता

खाद्यजत्रा

बुधवार, ३ डिसेंबर, २००८

निर्लज्जम सदासुखी!

"हद्द झाली! खरच आता हद्द झाली!" असं प्रत्येक हल्ल्यानंतर विषण्णतेने म्हणत असतो आपण. गेल्या बुधवारच्या घटनेने फक्त मुंबईलाच नाही, भारतालाच नाही तर अख्ख्या जगाला हादरवून टाकलय. नाहक मारली गेलेली सामान्य जनता आणि लढता लढता कामी आलेले आपले वीर... त्रिवार सलाम! सलाम तर आहेच त्यांना; पण श्रद्धांजली? काय श्रद्धांजली देणार आपण त्यांना? मिनिटांच मौन? क्षणभराची शांतता? शांततेसाठी लढलेल्यांना? काय हवं आहे स्वतंत्र भारतीयाला? एक स्वप्न - अखंड भारताचं, एक आस आहे - सौख्याची, आणि प्रतीक्षा आहे शांततेची.
पण, धन्य आहे ही जनता, आणि धन्य आहे तो राजा, धन्य आहे त्याचा दरबार आणि दरबारी पुतळे! अफलातून विधानं करण्याची तर चढाओढच लागलीये जणू. ह्यांच्या संवेदना बधिर झाल्या आहेत की मेंदुवरचा ताबाच सुटला आहे, काही कळत नाहीए. जनतेच्या वेदना या लोकांपर्यंत पोचतच नाहीत बहुदा.
आज एक आठवडा झाला या दुर्दैवी घटनेला. देशाच्या शहरा-शहरांधून लोक रस्त्यावर उतरले आहेत - लाखोंच्या संख्येने - मनात एकच प्रश्न घेऊन. "कधी थांबवणार आहात हे सगळं? कधी उघडणार आहेत तुमचे डोळे?" खरंच, या आवाजाने तरी ही मंडळी जागी होणार आहेत का? छे! विसरलेच मी ती म्हण! "झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याचं काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: