माझी कविता

खाद्यजत्रा

मंगळवार, ९ डिसेंबर, २००८

ग्रीन चिकन

साहित्य:
अर्धा किलो बोनलेस चिकन
आलं पेस्ट - टी स्पून
लसूण पेस्ट - टी स्पून
हिरव्या मिरच्या -
कांदे - (मध्यम)
कोथिंबीर - चिरून वाट्या
पुदीना पाने - चिरून वाटी
लवंगा, वेलची, मिरे, तेजपत्रे
मीठ, तेल इत्यादी.

कृती:
) चिकन स्वच्छ करून त्याचे क्यूब्स करून घ्यावे. त्याला मीठ, टी स्पून आलं पेस्ट आणि टी स्पून लसूण पेस्ट चोळून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर कूकरच्या सेपरेटर मध्ये अजिबात पाणी ना घालता मंद आचेवर शिट्टी काढावी.
) टेबल स्पून तेलावर लवंग, वेलची, मिरे घालून परतावे. त्यात उभा चिरलेला कांदा नीट परतून मिक्सर मध्ये छान पेस्ट करून घ्यावी.
) कोथिंबीर, पुदीना मिरचीची एकत्र पेस्ट करावी.
) तेलावर तेजपत्ता घालून हिरवी पेस्ट घालावी. उरलेली आलं-लसूण पेस्ट घालून परतावे. कांद्याची पेस्ट घालून परतावे आणि मग चवीनुसार मीठ घालावे. - मिनिटे परतून चिकनचे तुकडे घालावे. पाणी घालून एक उकळी आणावी.
) - मिनिटे मंद गॅसवर चिकनचे तुकडे ग्रेवीमध्ये मुरु द्यावे नंतर गॅस बंद करावा.
) हे चिकन जरा लीपतेच असते. चपाती किंवा नान सोबत बेस्ट!

सोमवार, ८ डिसेंबर, २००८

एस्लिंगेन

एस्लिंगेन हे श्टुट्गार्ट्ला अगदी लागूनच असलेलं ठिकाण. श्टुट्गार्ट हाउप्ट बाह्न्होफ (मेन स्टेशन) हून एस-बान (S-Bahn) ने गेलं तर १५ ते २० मिनिटांचंच काय ते अंतर! नेकार (Neckar) नदीच्या काठावरचं आणखी एक सुंदर स्थळ. धकाधकीच्या श्टुट्गार्ट शहराच्या इतकं जवळ असूनही स्वतःचं वेगळेपण अन् निसर्गसौंदर्य जपून असलेलं. एस्लिंगेन बद्दल एवढंच माहीत होतं आम्हाला... हो आणि तिथे एक Tiergarten - प्राणीसंग्रहालय आहे ही अधिक माहिती होती.

S-Bahn ने एस्लिंगेन स्टेशनवर उतरलो आणि बाहेर पडलो की पहिल्या काही क्षणातच याचं शांत, स्वस्थ मन आपल्याला ओळखू येतं. इथली संथ वाहणारी नदीही त्याच शांततेचं एक रूप जणू. आपल्या गंगा-यमुना नद्यांच्या मानाने इथलं हे पात्र अगदी नगण्यच! पण नदीला पाणी बर्‍यापैकी होतं. हवेतला गारवा आणि नदीची शीतलता यामुळेच मनालाही शांत आणि प्रसन्न वाटत होतं. नदीच्या दोन्ही बाजूंना झाडा-झुडुपांची मॅन-मेड कुंपणे आहेत. पण आता थंडीचे दिवस असल्याने पानं गळून जाऊन काटे-कुटेच काय ते उरले होते. प्रसन्न नदीची ही एकाच बाब काय ती जराशी उदास वाटू लागली मला. शाळेत शिकलेला 'चेतनोगुणोक्ती' अलंकार आठवला. खरच निसर्गाच्या विविध रूपांमध्ये इतक्या मानवी भावना दडलेल्या असतात का, की बागडणारं पाखरू पाहून आपणही उल्हासित व्हावं आणि कोमेजलेलं फूल पाहून मलूल? या निष्पर्ण झुडुपांशी किंवा या वाहत्या पाण्याला जरा वेळ थांबायला सांगून त्याच्याशी गप्पा मारल्या तर कितीतरी सुख-दुःखाच्या गोष्टी सांगून जातील. नदी म्हणेलही कदाचित - "मी वसंताची अगदी आतूरतेने वाट पाहतेय गं.... मग पानं फुटतील, फुलं फुलतील... रंग उधळतील माझ्या अंगणात!" विचारांच्या ओघामागे धावता-धावता Tiergarten पाशी कधी येऊन पोचलो ते कळलच नाही. Tiergarten ने मात्रा घोर निराशा केली. स्वच्छता आणि प्राणी दोहोंचाही अभावच होता तिथे. मग तिथे जास्त वेळ घालवला नाही आम्ही. Tiergarten कडे येतानाच, मी विचारांच्या चक्रात अडकले होते तेव्हा, राहुलने काहीतरी interesting पाहिलं होतं. मग सरळ तिकडेच निघालो आम्ही.

गरूडाला उंच आकाशात भरारी घेताना कसं वाटत असेल, किंवा तळ्यातल्या बदकाला सरसर पाणी कापत पोहताना कसं वाटत असेल? घारीला झेप घेऊन संथपणे एकाच लयीत हवेत तरंगताना कसं वाटत असेल, किंवा पाण्यात सूर मारताना माशाला कसं वाटत असेल? यातील प्रत्येकाला पाहतांना दरवेळी पडणारे हे प्रश्न! या सार्‍या प्रश्नांचं उत्तर दिला ते एका छोट्याश्या अनुभवाने - आइस-स्केटिंगच्या!

आइस स्केटिंगसाठी काउंटरवर मिळणारे स्पेशल शूज घेऊन आम्ही वेटिंग रूम मध्ये आलो. 'हे घालून मला उभं राहणं तरी जमेल का?' ही माझी मुख्य शंका होती. स्केटिंगची पहिलीच वेळ असल्याने 'मी बर्‍याच वेळा पडणार आहे' अशी मला भीती नव्हे तर अगदी खात्री वाटत होती. आणि हे सगळं माझ्या चेहऱ्यावर बहुदा बोल्ड टाइप मध्ये छापलं गेलेलं असणार! कारण एकानं आम्हाला विचारलंच - पहिलाच अनुभव आहे का म्हणून! मी स्केट्स घालून हळूहळू उभी राहीले. जमीन चाचपत एक पाउल पुढे टाकलं आणि मग दुसरं. "हं, ठीक आहे. काही नाही, फक्त खूप हाइ हील्स घातल्यासारखं वाटतंय." नवऱ्याच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाकडे पाहून मी म्हटलं. चालण्यापुरतं ठीकच होतं. पण आता पाउल आइस फ्लोर वर ठेवायचं होतं. आताच तर खरी मज्जा येणार होती.

मला स्केटिंग या प्रकाराबद्दल जेवढी उत्सुकता होती तेवढीच ते शिकयची मनापासून इच्छाही होती. आयुष्यात आधी चुकुनही रोलर-स्केटिंगसुद्धा केल नव्हतं. आमच्या घरासमोर स्केटिंग करणारी लहान मुलं आठवली. छ्या! सालं ते तरी शिकायला हवं होतं आपण लहानपणी, मला आपलं वाटून गेलं. दोन्ही हातांनी फ्लोर चा कठडा घट्ट धरून मी 'मैदानात उतरले'. नंतर एका हाताने कठडा धरून आणि दुसऱ्या हाताने राहुलला धरून अस्मादिकांनी प्रारंभ केला. 'सुळकन घसरणं' म्हणजे कसं घसरणं हे पहिल्या काही क्षणातच कळलं. राहुल मला बर्‍याच टिप्स देत, हाताने धरून धरून, मोटीवेट करत शिकवत होता. हळूहळू मी शिकत होते. मध्ये-मध्ये पडतही होते, पण मला खूप मजा येत होती.

अर्धा तास झाला असेल सेशन सुरू होऊन. स्केट्स च्या फराट्यांनी फ्लोर अगदी विस्कटून गेला होता. तो पुन्हा पूर्ववत प्लेन करण्यासाठी पॉज घेण्यात आला. स्केटिंग मध्ये मग्न झालेल्या तमाम जनतेला फ्लोरच्या बाहेर घेण्यात आलं. एक भलं मोठ्ठं ट्रॅक्टर एवढं आणि तसंच दिसणारं मशीन फ्लोर वर आणलं गेलं. काही वेळाने या मशीनमधून पाण्याचा एक लेयर फ्लोर वर पसरवला. आइस फ्लोर आधीच खूप थंड असल्याने पाणी लगेच गोठत आणि फ्लोर पुन्हा गुळगुळीत बनतो - आपल्याला तात्पुरतं गरूड किंवा मासा होता यावं म्हणून! पुन्हा सगळे फ्लोर वर आले. कुणी लहान मुलांना शिकवत होतं, कुणी जोडीनं, एकमेकांच्या सोबतीनं हा आनंद घेत होतं, कुणाची मित्र-मैत्रिणींबरोबर धमाल चालू होती. कुणी उगाच आपले कसब दाखवत कुणाला इंप्रेस करण्याच्या तालात होतं तर कुणी (म्हणजे मी) शिकत होतं, पडत होतं. एकदा तर मी चक्क लोटांगणच घातलं. काहीही असो, महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक क्षण एन्जॉय करत होते.

मला आकाशात भरारी नाही घेता येणार गरुडासारखी, कदाचित. आणि माशासारखा सूरही नाही मारता येणार एक वेळ; पण या आनंदाचा रस्ता आता माझ्यासाठीही खुला झालाय. असा अक्षरशः वेडा विचार मनात घेऊन मी एस्लिंगेनचा निरोप घेतला.